फुलंब्रीत काँग्रेसतर्फे रास्ता रोका !

Foto


फुलंब्री:   तालुक्यात सध्या सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत शासन गंभीर नाही. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी फुलंब्री शहरातील खुलताबाद रोडवरील टी पॉईंटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. फुलंब्री तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्य जनतेला अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासन शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे डोळेझाक करत आहे. अनेक दुष्काळ शेतकर्‍यांना अद्यापही शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक उपाययोजना न करता शासन व प्रशासन चालढकल करत आहे. शासनाच्या या भूमिकेविरोधात आज मंगळवारी आठवडी बाजारच्या दिवशी फुलंब्री येथे सकाळी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. सुभाष झांबड, विलास औताडे, शहराध्यक्ष नामदेवराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी अकरा वाजता आंदोलन सुरू झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तब्बल दीड तास हे आंदोलन सुरू होते. आंदोलनामुळे वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.

 आंदोलनकर्त्यांनी डॉ.काळे यांच्या नेतृत्वाखाली फुलंब्रीचे तहसीलदार सुरेद्र देशमुख यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ मदत द्या, जनावरांच्या चारा छावण्या सुरू करा, रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करा, शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, खरीप हंगामासाठी पीक विमा मंजूर करा, सतत पडणार्‍या दुष्काळाने त्रस्त शेतकर्‍यांना मोफत बी-बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करून द्या, शेतकर्‍यांचे संपूर्ण वीजबिल माफ करा, पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर कमी करा,  बोंडअळीचे व फळबागांना त्वरित अनुदान द्या, दुधाला 40 रुपये भाव मिळालाच पाहिजे, शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान मिळालेच पाहिजे, पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करा, पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी जेसीबी मशीन उपलब्ध करून द्यावे, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थीच्या फायली त्वरित मंजूर करा, औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा, या महामार्गावरील अपघातात मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबांना त्वरित नुकसान भरपाई द्या आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

यावर  माजी आमदार डॉ. कल्याण काळे म्हणाले, केंद्रातील व राज्यातील भाजप व शिवसेनेच्या सरकारला शेतकर्‍यांशी काही घेणे-देणे नाही. हे शासन शेतकरीविरोधी आहे. फुलंब्री तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला आहे आणि प्रशासकीय अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. दुष्काळामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या जनावरे सांभाळण्याची ताकद नाही. सरकारने वेळीच सहा महिन्यांपूर्वी चारा छावण्या सुरू करणे गरजेचे होते; परंतु आगामी विधानसभा निवडणुका बघता शेतकर्‍यांसमोर लोटांगण घालण्यासाठी आता चारा छावण्या सुरू करण्यात आल्या, अशी जोरदार टीका करत काळे यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. हे सरकार फक्‍त अंबानी, अदानी,  टाटा, बिर्लासारख्या उद्योगपतींचे हित पाहत आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत सरकार असंवेदनशील आहे, असा आरोपही त्यांनी केला.

तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप बोरसे, सुदाम मते, राजेंद्र चव्हाण, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जाधव, अनिल बोरसे, जिल्हा बँकेचे संचालक पुंडलिक जंगले, विटेकरवाडीचे सरपंच सदािेशव विटेकर, अजगर पटेल, श्यामराव साळुंके, शेख रज्जाक, फुलंब्री नगरपंचायतीचे नगरसेवक अब्दुल रऊफ कुरैशी, मुदस्सर पटेल, सुभाष गायकवाड, महिला तालुकाध्यक्षा संगीता मारक, सुदाम चव्हाण, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विठ्ठल कोरडे, योगेश जाधव, पंढरीनाथ जाधव, कचरू मैद, संतोष मेटे, इद्रीस पटेल, हाफीस मन्सूरी, इफ्तेखार सय्यद यांच्यासह तालुक्यातील काँग़्रेस कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, कामगार व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.